पाटणा : बिहारमधील बारावी परीक्षेतील टॉपर्सचे अगाध ज्ञान टीव्ही वाहिन्यांनी प्रकाशात आणल्यानंतर शिक्षण मंडळाने तातडीने घेतलेल्या फेरपरीक्षेत या विद्यार्थ्यांचे खरे गुण समोर येताच त्यांचे निकाल रद्द करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. रुबी या कला शाखेतील टॉपर विद्यार्थिनीने पॉलिटिकल सायन्सला प्रॉडिगल सायन्स असे संबोधले होते, ती या परीक्षेला प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिली.बिहार शालेय शिक्षण परीक्षा मंडळाने (बीएसईबी) त्यांच्या महाविद्यालयांना जोरदार दणका देत त्यांची मान्यात पुढील नोटीसपर्यंत निलंबित ठेवली आहे. या परीक्षेत ६६४ पैकी ५३४ विद्यार्थ्यांनी प्रथमश्रेणी मिळविली होती. विज्ञान शाखेत सर्वप्रथम आलेल्या सौरभ श्रेष्ठ आणि त्याचा महाविद्यालयीन सहकारी राहुल कुमार यांचा विज्ञान आणि कला या शाखांमधील पहिल्या १३ टॉपर्समध्ये समावेश होता. निकाल घोषित होताच या विद्यार्थ्यांनी टीव्ही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये दिलेली उत्तरे धक्कादायक होती. एकाला पाण्याचे रेणूसूत्र एचटूओ आहे हे माहीत नव्हते. उर्वरित ११ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण केली असून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. विष्णू राय महाविद्यालयाचे सौरभ आणि राहुल यांचे निकाल रद्द करण्यात आल्याचे मंडळ अध्यक्ष लालकेश्वर प्रसाद सिंग यांनी स्पष्ट केले. वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर येथील विष्णू राय महाविद्यालयाचे हे दोघे विद्यार्थी होते. या महाविद्यालयाची मान्यता तात्पुरती काढून घेण्यात आली आहे.
बारावी टॉपर्सचे निकाल अखेर रद्द
By admin | Published: June 06, 2016 1:55 AM