नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांचे ताजे निकाल ही आम्ही चाचणी परीक्षा मानत नाही. त्यांचा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांशी संबंध नाही, असा सूर आता भाजपाने आळवला आहे.पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, पोटनिवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या गेल्या. त्यामुळे भाजपा किंवा मोदी सरकारच्या लोकप्रियतेशी त्याचा संबंध लावणे योग्य नाही. २०१४ च्या निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशात नऊ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांत भाजपाचा बहुतेक जागांवर पराभव झाला. परंतु, त्यानंतर लोकांनी विकासासाठी ३२५ जागा जिंकून देऊन योगी आदित्यनाथ सरकार स्थापन केले.उत्तर प्रदेशमधील भाजपाचा नेता म्हणाला की, २०१९ मध्ये निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली जाईल. निवडणूक देशाचे सरकार निवडण्यासाठी असेल व ती केंद्राच्या कामगिरीच्या आधारावर लढवली जाईल. मतदार स्थानिक मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा मोदी यांना आपला नेता निवडेल.पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, गुरुवारच्या निकालांनी मोदी सरकार किंवा भाजपाची लोकप्रियता मोजण्याची गरज नाही. या निकालाच्या आधारे भाजपाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले गेले. परंतु, कर्नाटक आणि त्याआधी अनेक राज्यांत ते चुकीचे सिद्ध झाले.भोपाळमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा पराभव विजयाची तयारी असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, लांब उडी घेण्यासाठी चार पावले मागे यावे लागते. भाजपा मुख्यालयात सकाळपासून उत्साह होता. पत्रकारांची ये-जा दिवसभर सुरू होती. परंतु, मतमोजणी सुरू होताना नेत्यांमध्ये जो उत्साह दिसला तो नंतर निकाल जाहीर होताना राहिला नाही. त्याबरोबर नेत्यांची संख्याही कमी कमी होत गेली. मतांतील अंतर स्पष्ट होईपर्यंत त्यांनी आशा सोडली नाही व ते पक्षाच्या विजयाचा दावा करीतच राहिले.
निकालांचा २०१९ शी संबंध नाही - भाजपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:08 AM