नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, वैयक्तिक पातळीवरील टीका यांमुळे गाजलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या, मंगळवारी लागणार असून, या निकालांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात आहे. या निकालांद्वारे मोदी व त्यांचा भाजपा पुन्हा तीन राज्यांवर आपला प्रभाव कायम ठेवणार की, काही राज्ये हातातून गेल्यामुळे काँग्रेसचा दबदबा वाढणार, हे स्पष्ट होणार आहे.उद्या सकाळी आठ वाजता या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या रिंगणात असलेल्या सुमारे ८५00 उमेदवारांचे भवितव्य ठरवणारे निकाल आता १ लाख ८४ हजार मतदान यंत्रांमध्ये बंद आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये सध्या भाजपाची सत्ता असून, ती टिकवणे भाजपासाठी महत्त्वाचे आहे. तिथे फटका बसला तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांवरही होईल, अशी भाजपा नेत्यांना भीती आहे. त्यापैकी राजस्थानमधील भाजपाची सत्ता जाण्याची शक्यता एक्झिट पोलनी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही भाजपा व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस झाल्याचे हे एक्झिट पोल सांगत असून, त्यांच्यापैकी काहींनी तिथे पुन्हा भाजपा सरकार बनवेल, असे निष्कर्ष काढले आहेत, तर काहींनी तेथील सत्ता काँग्रेसला मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. प्रत्यक्षात ही तिन्ही राज्ये काँग्रेसकडे आली, तर तो पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी मोठाच विजय व भाजपासाठी त्याहून मोठा पराभव असेल. कोणालाही बहुमत न मिळाल्यास तिथे आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित केल्याने तिथे निवडणुका घ्याव्या लागल्या आहेत. जवळपास सर्व एक्झिट पोलनी राज्यात पुन्हा टीआरएसच सत्तेवर येईल, असे म्हटले असले, तरी काँग्रेस अद्यापही आमचेच सरकार येईल, असा दावा करीत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील हे राज्य नेमके कोणाला साथ देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मिझोरममध्ये काँग्रेसचे सरकार असले तरी तिथे मुख्य सामना आहे काँग्रेस व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात. तिथे भाजपाला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही, असे एक्झिट पोल सांगतात. तरीही काँग्रेसविरोधी सरकार मिझोरममध्ये यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे भाजपाने म्हटले. तिथे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचे अंदाज आहेत. अशा स्थितीत काँग्रेस व अपक्ष आमदार प्रसंगी मिझो नॅशनल फ्रंटच्या मागे उभे करण्याचा प्रयत्न भाजपाने केला, तर आश्चर्य वाटू नये.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:25 AM