नवी दिल्ली - दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्यांचा विजय झाला आहे. डाव्या संघटनांच्या ‘लेफ्ट युनिटी’ ला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. ‘लेफ्ट युनिटी’ने विद्यार्थी संघाच्या चारही महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी (अभावप) परिषदेचा पराभव झाला असून अभावपला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. तर, ‘बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन’ (बापसा) तिसऱ्या स्थानावर आहे. शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे येथे मतमोजणी थांबवण्यात आली होती, पण आज तणावपूर्ण परिस्थितीत येथे मतमोजणी पूर्ण करण्यात आली.
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या डाव्या संघटनांनी 'लेफ्ट युनिटी' म्हणून एकत्रित निवडणूक लढवली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन. बालाजी याने अभाविपच्या ललित पांडेचा 1179 मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी सारिका चौधरी (2592), महासचिवपदी एजाज अहमद राथेर (2426) आणि संयुक्त सचिवपदी अमुथा (2047) मते मिळवत विजयी झाले.