लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. यानंतर लगेचच ५ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या केंद्रीय मंत्रिमंडळाला फेअरवेल डिनर देणार आहेत. याचे आयोजन रात्री ८ वाजता केले जाणार आहे. १६ जूनला १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वीच नवीन सरकार स्थापन करण्यात येणार आहे.
प्रत्येक लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीनंतर राष्ट्रपतींकडून मंत्रिमंडळाचा निरोप समारंभ आयोजित करण्यात येतो. यावेळी ५ जूनला याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीचा आज सातवा टप्पा पार पडत आहे. थोड्याच वेळात मतदान संपणार आहे. यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागून राहणार आहे. सुमारे अडीज महिने चाललेल्या या लोकशाहीच्या कुंभमेळ्यात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर गोंधळ घालण्याचे, ताब्यात घेण्याचे प्रकार घडले आहेत. याच्या तक्रारी देखील निवडणूक आयोगाकडे झालेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडल्या आहेत. यापैकी अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 जूनला जाहीर होणार आहेत. तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशचे निकाल 4 जूनला सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांसह जाहीर होणार आहेत.