एस.के. गुप्ता ।
नवी दिल्ली : देशात वैद्यकीय महाविद्यालयांतील ८० हजार जागा भरण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (नीट-यूजी) परीक्षेचा निकाल ५ आॅक्टोबरपर्यंत जाहीर होईल. १६ लाख विद्यार्थ्यांनी पेन-पेपर आधारित एका दिवसाची ही परीक्षा दिली. या परीक्षेला जवळपास ८५ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. एनटीएने परीक्षेची अॅन्सर की जारी करून विद्यार्थ्यांना ४८ तासांचा प्रतिसादासाठी वेळ दिला होता. त्या प्रतिसादावरून निकाल तयार केला जात आहे.
एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, ‘जेईई मुख्य परीक्षेच्या तुलनेत नीट परीक्षेचा निकाल यायला बराच वेळ लागतो. जेईई मुख्य परीक्षेचा निकाल परीक्षेनंतर सहाव्या दिवशी जाहीर केला गेला होता. नीट परीक्षेच्या निकालाला विलंब हा परीक्षा संगणक आधारित नसून, मॅन्युअल असल्याचा आहे. यामुळे परीक्षेची ओएमआर शीटला स्कॅन करण्यात बराच वेळ लागतो. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.’ देशातील ५३६ वैद्यकीय महाविद्यालयांत ८० हजार जागा आहेत. त्यात अर्ध्या जागा सरकारी महाविद्यालयांकडे, तर राहिलेल्या खासगी महाविद्यालयांकडे आहेत.एनएमसी बिल कायद्यात खासगी महाविद्यालयांच्या ५० टक्के जागा म्हणजे २० हजार जागांचे शुल्क निश्चित करण्याचा अधिकार सरकारला दिला गेला आहे.या प्रकारे ७५ टक्के वैद्यकीय जागा (६० हजार) जागांचे शुल्क सरकार निश्चित करील.