नवी दिल्ली: भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे किरकोळ महागाई दराने जुलैमधील १५ महिन्यांचा विक्रम मोडला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ४.८७ टक्के होती. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलै महिन्यात तो ६.७१ टक्के होता. जुलै २०२३ पूर्वी किरकोळ महागाईचा दर एप्रिल २०२२मध्ये सर्वाधिक ७.७९ टक्के होता.
जुलैमध्ये ग्राहक अन्न निर्देशांक महागाई ११.५१ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर अन्न व पेय पदार्थांच्या बास्केटमधील महागाई १०.५७ टक्क्यांवर पोहोचली आहे. जूनमध्ये भाज्यांच्या किरकोळ महागाईचा दर -०.९३ टक्के होता. जुलैमध्ये ती वाढून ३७.३४ टक्के झाली. ग्रामीण भागातील महागाई ७.६३ टक्के तर शहरी महागाई ७.२० टक्के आहे. जुलै महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर ३७.३४ टक्के होता. जून २०२३मध्ये हा दर उणे ०.९३ टक्के होता. याचाच अर्थ एका महिन्यात पालेभाज्या आणि भाज्यांच्या महागाई दरात ३८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डाळींच्या महागाईचा दर १३.२७ टक्के इतका आहे.
किरकोळ महागाईच्या ताज्या आकडेवारीने रिझर्व्ह बँकेचा ताण वाढला आहे. सलग चार महिने नियंत्रणात राहिल्यानंतर किरकोळ महागाईने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दराने रिझव्र्ह बँकेने ठरवून दिलेले २-६ टक्क्यांचे उद्दिष्ट ओलांडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. महागाई दर उद्दिष्टापेक्षा जास्त गेल्यावर रिझर्व्ह बँकेवर रेपो दर वाढवण्यासाठी दबाव येऊ शकतो.
महागाई कधी कमी होणार?
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, Acuite रेटिंग्स अँड रिसर्चचे संशोधन प्रमुख सुमन कुमार चौधरी म्हणाले, भाजीपाला लागवडीचे छोटे चक्र आणि किमती कमी करण्यासाठी सरकारने काही पावले उचलल्यामुळे हा महागाईचा उच्च दर नोव्हेंबर-डिसेंबर २०२३च्या पुढे राहील असं वाटत नाही. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांनंतर अन्नधान्य महागाई कमी होण्याची शक्यता आहे.