मुंबई : कमी पावसामुळे कांदा, बटाटा व टोमॅटो या सर्वाधिक मागणीच्या तीन भाज्यांचे दर वधारू लागले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीपर्यंत (जानेवारी-मार्च २०१९) किरकोळ महागाई दरात वाढीची शक्यता आहे. हा दर ४ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो, असा स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचा अंदाज आहे.आॅगस्ट महिन्यातील महागाईचा दर जुलैच्या ४.१७ टक्क्यांवरून ३.६९ पर्यंत घसरला, पण खरिपाच्या पिकांची स्थिती कमी पावसामुळे आॅगस्टनंतर बदलली. सप्टेंबर महिन्यात घाऊक बाजारात कांदा ९ टक्के महाग झाला आहे. नोव्हेंबर ते मे या काळात कांद्याची मागणीमोठी असते. यामुळे कांद्याचे दर किमान २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. सध्या २ टक्के महाग झालेला टोमॅटोसुद्धा ५ ते १० टक्के व अडीच टक्के महाग असलेले बटाट्याचे दरही १० टक्क्यांपर्यंत वधारू शकतात. यातूनच महागाई दर वाढेल, असा अंदाज बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात धान्यांची आवक यंदा वाढलेली आहे, पण भारतीय बाजार हा देशांतर्गत पिकांवर अवलंबून असतो. कमी पावसामुळे देशांतर्गत भाजीपाला व धान्यांची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता आहे.कृषी निर्यात धोरण आवश्यककमी पावसामुळे सध्या देशात निर्माण झालेली स्थिती पाहता, केंद्राने कृषी निर्यात धोरण लवकरात लवकर तयार करण्याची गरज आहे. हे धोरण लवकर तयार झाल्यास महागाईच्या दरावर त्याचा निश्चितच परिणाम दिसेल.
कमी पावसामुळे किरकोळ महागाई वाढणार; कांदा, बटाटा व टोमॅटोचे दर वधारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:33 AM