बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबमधील निवृत्त सहाय्यक पोलिस महानिरीक्षक मालविंदर सिंग सिद्धू यांनी शनिवारी त्यांचे आयआरएस जावई हरप्रीत सिंग यांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सिद्धूला अटक केली असून, शस्त्रही जप्त केले आहेत. जिल्हा न्यायालयाच्या मध्यस्थी कक्षात घडलेल्या या घटनेने माेठी खळबळ उडाली आहे.
हरप्रीत सिंग यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांना लागल्या. जखमी अवस्थेत लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सिद्धू यांची मुलगी आणि तिचा पती यांच्यात अनेक दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. २०२३ पासून या प्रकरणात घटस्फोटाची कारवाई सुरू आहे. हरप्रीत यांची पत्नी सध्या परदेशात आहे. त्यांच्यावतीने मालविंदर हे न्यायालयात उपस्थित हाेते. जिल्हा न्यायालयाच्या मध्यस्थी कक्षात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास चर्चा सुरू असताना दोन गटांत वाद वाढत गेला. हरप्रीत हे त्यांच्या आई-वडिलांसोबत तर मालविंदर सिंग दुसरीकडे हजर होते. वाद एवढा वाढला की, मालविंदर सिंग यांनी पिस्तूल काढली आणि हरप्रीतवर गाेळ्या झाडल्या. पोलिसांनी तत्काळ सिद्धूला ताब्यात घेतले.