नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवानांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्यासंदर्भात ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपीन रावत यांनी मोठे विधान केले आहे. जवानांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे करण्यासाठी लष्कराच्या तिन्ही दलांकडून संशोधन करण्यात येत असल्याचे बिपीन रावत यांनी सांगितले.
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, लष्कराचे अधिकारी वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. या वयापर्यंत त्यांची मुलं सेटल होतात किंवा सेटल होण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे ही समस्या अधिकाऱ्यांचीच नाही तर जवानांची आहे. जवानांची नियुक्ती वयाच्या 18 व्या वर्षी केली जाते. ते लष्करातून वयाच्या 37-38 व्या वर्षी निवृत्त होतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागते, असे बिपीन रावत यांनी सांगितले.
याचबरोबर, लष्कराच्या एक तृतीयांश जवानांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे असले पाहिजे. सध्या जवान वयाच्या 38 व्या वर्षी निवृत्त होतात. 17 वर्षांच्या सेवेनंतर आम्ही जवानांना सरासरी 30-32 वर्षापर्यंत पेन्शन देतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून 38 वर्षापर्यंत देशसेवा का करून घेऊ शकत नाही आणि 20 वर्षांपर्यंत पेन्शन का देऊ शकत नाही. आम्ही हा ट्रेंड बदलण्याच्या मार्गावर आहेत, असेही बिपीन रावत म्हणाले.
याशिवाय, सरकारने डिफेंस बजेटमध्ये 3.18 लाख कोटी वाढवून 2020-21मध्ये 3.37 लाख कोटी केले आहे. यामुळे लष्काराचे आधुनिकीकरण केले जाऊ शकते. आर्मी मेडिकल कॉर्प (AMC) चा विचार केल्यास मला वाटते की, 100 टक्के एएमसीचे जवान 58 वर्षांपर्यंत सेवा देऊ शकतात, असेही बिपीन रावत यांनी सांगितले.
जनरल रावत पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’बिपिन रावत यांची ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली. लष्करप्रमुखपदाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. लष्कर, हवाई दल व नौदलात समन्वय साधण्यासाठी जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी होती. आतापर्यंत तिन्ही दलांच्या प्रमुखांतील ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्यास ते पद दिले जायचे. याऐवजी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. याशिवाय संरक्षण मंत्रालयात मिलिटरी अॅफेअर्स विभागही स्थापन केला आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ संरक्षणमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील. लष्करप्रमुखाचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. निवृत्त लष्करप्रमुखास ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नेमल्यास त्यास तीन वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत कार्यकाळ मिळेल.