नवी दिल्ली - काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सक्रीय राजकाराणामधून निवृत्ती स्वीकारण्याचे संकेत दिले आहे. आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिकवेशनासाठी उपस्थित राहिलेल्या सोनिया गांधी यांनी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या निवृत्तीबाबत वक्तव्य केले आहे. सर्वाधिक काळ काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा पुत्र राहुल गांधी यांच्या हाती सोपवण्याच निर्णय नुकताच घेतला होता.राहुल गांधींकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे दिल्यानंतर त्यांच्या पक्षातील आगामी भूमिकेविषयी विचारले असता सोनिया गांधींनी आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केले. "मी निवृत्त होत आहे," असे त्या म्हणाल्या. राजीव गांधी यांच्या निधनानंतर काही वर्षे राजकारणापासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी यांनी 1998 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी 19 वर्षे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली होती.सोनिया गांधींची सक्रिय राजकारणामधील निवृत्ती ही काँग्रेसमधील नव्या युगाचा आरंभ मानला जात आहे. आता शनिवारी 16 डिसेंबर रोजी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. यावेळी राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले जाईल. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्व राज्यांतून मिळून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ८९ अर्ज आले होते. ते अर्थातच राहुल गांधी यांच्या नावाचे होते, असे काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मलापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले. काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणार ते घरातील सहावे अध्यक्ष असतील. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने देशभरात सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ राज्य केले होते. मात्र भाजपाचा प्रभाव वाढू लागल्यापासून काँग्रेसच्या विस्ताराला खीळ बसली होती. एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसची सध्या केवळ 5 राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशावर सत्ता आहे. त्यामुळे नव्याने अध्यक्ष होत असलेल्या राहुल गांधीसमोर काँग्रेसचा दुरावलेला जनाधार परत मिळवून देण्याचे आव्हान असेल.
सोनिया गांधींनी दिले सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 12:27 PM