गुवाहाटी - डोकलाम वाद संपुष्टात आल्यानंतर चीन पुन्हा भारतीय हद्दीत आपले सैनिक घुसविण्याचा प्रयत्न करणार नाहीत, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. चिनी सैनिकांनी डिसेंबरअखेर रस्ते उभारण्याच्या यंत्रसामुग्रीसह अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील गावापर्यंत मजल मारली. तिथे ते रस्ता बांधण्यासाठीचे सामान घेऊ न आले होते.चिनी सैनिकांनी माघार घेतली असली तरी अरुणाचलचे अस्तित्व मान्य करायलाच चीनने नकार दिला आहे. म्हणजेच अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे, हे मान्य करण्यास चीन तयार नाही, हे स्पष्ट आहे.मात्र सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना वेळीच रोखले. चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याच्या वृत्तास सुरक्षा संस्थेतील लोकांनी दुजोरा दिला आहे. जवळपास ८ ते १० दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मात्र तो आता उघडकीस आला आहे.सुरक्षा यंत्रणेतील एका अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला. भारतीय जवानांनी वेळीच त्यांना रोखल्याने चिनी सैनिक सोबत आणलेली यंत्रसामुग्री तेथेच सोडून माघारी फिरले, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, ते माघारी गेल्याने तणाव निर्माण झाला नाही. गेल्या काही महिन्यांपासून चीनने सीमेलगतच्या भागात रस्ते उभारण्याचा सपाटा लावला आहे.भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना तुतिंग उपविभागात सियांग नदीच्या पूर्वेकडील काठावरील बिसिंग गावानजीकच रोखले, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यावेळी भारतीय जवान आणि चिनी सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले. भारतीय जवानांनी त्यांना गेलिंग गावांपर्यंत मजल मारू दिली नाही. भारतीय जवानांचा आक्रमक पवित्रा बघून चिनी सैनिकांंना माघारी परतणे भाग पडले. ही यंत्रसामुग्री भारतीय जवानांनी ताब्यात घेतली आहे.मात्र अप्पर सियांगचे उपायुक्त दुली कामदूक म्हणाले की, तुतिंग उपविभागातील आमच्या अधिकाºयांकडून चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचे कोणतेही वृत्त मिळालेले नाही. सशस्त्र दलांकडूनही याला दुजोरा नाही. या घडामोडीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर लष्कराच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला. ईशान्य भागातील लष्कराच्या अधिकाºयांनी या वृत्ताचा थेट इन्कारही केला नाही वा स्पष्ट दुजोराही दिला नाही.दुसºयांदा घुसखोरीचार महिन्यांपूर्वी डोकलाम भागातही भारतीय जवान आणि चिनी सैनिक एकामेकांविरुद्ध उभे ठाकल्याने दोन देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर चिनी सैनिकांनी घुसखोरी करून पुन्हा सीमेवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)अरुणाचलचे अस्तित्वच अमान्य : चीनअरुणाचल प्रदेशचे अस्तित्वच चीनला मान्य नाही. चीनच्या प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताबाबत मौन बाळगले आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, आमची भूमिका स्पष्ट आहे. अरुणाचल प्रदेशचे अस्तित्व आम्ही कधीच मान्य केलेले नाही. सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगच्या ३,४८८ कि.मी. लांब क्षेत्रावरून दोन्ही देशांत वाद आहे.
भारतीय सैन्याने अरुणाचलमध्ये चीनचा घुसखोरीचा डाव उधळून लावला! बांधकाम साहित्य केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 2:11 AM