मुंबई - कोरोना महामारीमुळे देशात तब्बल ५६ दिवसांचा कडेकोट लॉकडाउन पाळण्यात आला. त्यानंतर, अनलॉक करण्यास सुरुवात झाली असून हळू हळू सर्वच व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात आत्तापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर, महाराष्ट्रातही लाखांच्यावर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे, जवळपास ८० दिवस उलटले तरीही,000 कोरोनाच संकट नागरिकांच्या डोक्यावर घोंघावत आहे. कोरोना लॉकडाउन काळात विमान प्रवासाचं बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचं रिफंड करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी पत्र लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक २४ मार्चपासून देशात लॉकडाउन होणार असल्याची घोषणा केली अन् देशात सर्वत्र शट डाउन झाले. चहाच्या कँटीनपासून ते देश आणि विदेशातील विमानप्रवासापर्यंत सर्वकाही २१ दिवसांसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर, अद्यापही हा लॉकडाउन सुरुच असून आता हळू हळू सर्वच व्यवहार सुरु होत आहेत. देशातील नागरिकांनी रेल्वे आणि विमानाचे तिकीट बुकींग केले होते. मात्र, अचानक लॉकडाउन घोषित केल्यामुळे या प्रवाशांचा प्रवास पूर्णत्वास गेला नाही. देशात आणि विदेशात प्रवास करण्यासाठी लाखो प्रवाशांनी विमानाचे बुकिंग केले होते. मात्र, त्यांनाही आपला प्रवास रद्द करावा लागला आहे. त्यामुळे, या रद्द झालेल्या प्रवासाच्या तिकीटांचे रिफंड लवकरात लवकर करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून विमानकंपन्यांकडून प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. ठराविक कालावधीत हे पैसे परत मिळणे आवश्यक आहे, प्रवाशांना तो ग्राहकाधिकार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.