नवी दिल्ली - देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावासाने धुमाकूळ घातला आहे. उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, दिल्लीत पावसाने १५ वर्षांचा रेकॉर्ड तोडला असून रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस दिल्लीकरांना अनुभवला. रविवारी सकाळी ८ वाजता ७४ मीमी पावसाची नोंद झाली असून जो २००७ नंतर यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस आहे.
हवामान खात्याने पावसासंदर्भात उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशच्या ४५ जिल्ह्यात मुसळधार पावसाची संभावना व्यक्त करण्यात आली आहे. तर, राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने झालेल्या दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. गौतमबुद्ध नगर, गाजियाबाद, बुलंदशहर, हापुड़, मेरठ व लखनौसह २ डझन जिल्ह्यात प्रशासनाने पावसाची शक्यता लक्षात घेत सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, गुजरातच्या काही भागात, तेलंगाना, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडु, केरल व पूर्वोत्तर भारतातील सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपुर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे हलक्या सरी कोसळू शकतात.
दरम्यान, राजधानी दिल्लीत सोमवारी पावसाचा जोर कमी होईल. ढगाळ वातावरणासह काही भागांत हलकासा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच, मंगळवारपासून हवामान पूर्णपणे साफ होणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.