धारवाड - शाळेतील जुन्या, गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी रियुनियनचा म्हणजेच पुन्हा एकदा मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा खास प्लॅन केला जातो. कित्येक वर्षांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद असल्याने भरपूर मजा, मस्ती आणि धमाल केली जाते. मात्र रियुनियन प्लॅनचा आनंद एका ग्रुपला उपभोगताच आला नाही. पिकनिकसाठी निघालेल्या बसवर काळाने घाला घातला आहे. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात इट्टीगट्टी या ठिकाणानजीक शुक्रवारी सकाळी मिनीबस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
मिनीबसने सर्वजण गोव्याला जात असल्याची माहिती मिळत आहे. रियुनियनचा प्लॅन करणारे सर्वजण हे St. Paul’s शाळेचे विद्यार्थी होते. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिनीबस आणि ट्रकची धडक भीषण होती. प्रवाशांपैकी 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बहुतांश महिला प्रवासी आहेत. या भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
PMO च्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करण्यात आलं आहे. धारवाडमधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 11 जणांच्या मृत्यूने मोदीही भावूक झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अपघात नेमका कसा झाला याबाबतही माहिती घेतली जात आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी पोलिसांनी धारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. तसेच या अपघातातील जखमींना केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.