हैदराबाद : तेलंगणाकाँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांनी आज दुपारी तेलंगणाचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हैदराबादमधील ए.बी. स्टेडियमवर त्यांचा शपथविधी सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीहून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही उपस्थित राहिले होते. ५६ वर्षीय रेवंत रेड्डींसह ११ आमदारांचा मंत्रीपदासाठीचा शपथविधी झाला.
राज्यपाल तमिलीसाई सौंदर्यराजन यांनी रेवंत रेड्डींसह सर्वच ११ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून भट्टी विक्रमार्क यांनी शपथ घेतली. बुधवारी रेवंत रेड्डी यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेऊन शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले होते. तर, तेलंगणाती जनतेलाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. म्हणूनच, विशाल अशा एलबी स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यासाठी, फुलांनी सजवलेल्या जीमधून रेवंत रेड्डीचं मैदानावर आगमन झालं. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हेही उपस्थित होते.
काँग्रेसने तेलंगणात ६४ जागा जिंकल्या
काँग्रेस हायकमांडने मंगळवारी रेवंत रेड्डी यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते आणि तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव केला आणि एकूण ११९ जागांपैकी ६४ जागा जिंकल्या. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला ३९ जागांवर समाधान मानावे लागले.