नवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल भडकली होती. 1984 रोजीच्या या दंगलीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. ही दंगल काही केल्या थांबण्याचं नाव घेत नव्हती. या दंगलीदरम्यान दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे माझ्यासोबत रस्त्यावर खुलेआम फिरत होते, असं विधान 1984च्या शीख दंगलीचे मुख्य आरोपी आणि माजी खासदार जगदीश टायटलर यांनी केलं आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टायटलर यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. दंगल भडकली त्यावेळी राजीव गांधी माझ्यासोबत कारमध्ये बसले होते. आणि या दंगलीचे दिल्लीत कसे पडसाद उमटतायत, याची चाचपणी केली होती. शीख विरोधी दंगल भडकल्यामुळे राजीव गांधी काहीसे काँग्रेस खासदारांवर नाराज होते. मतदारसंघात शांतता बाळगण्याचे आवाहन करा, असा आदेश त्यांनी काँग्रेस खासदारांना दिला होता, असंही टायटलर म्हणाले आहे. दिल्लीतल्या रस्त्यांवर दंगल कशी घडते, याचा पंतप्रधान राजीव गांधींनी आढावाही घेतला होता.जगदीश टायटलर यांच्या विधानानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. टायटलर यांच्या विधानानुसार राजीव गांधी हे 1984मध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत होते. टायटलर यांनी केलेल्या विधानाचा अर्थ तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे शिखांच्या हत्या कशा प्रकारे होतात, यावर लक्ष ठेवून होते, असाही निघत असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही बादल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.जगदीश टायटलर यांचं विधान निराधार असल्याचं म्हणत काँग्रेसनं त्यांच्यावर पलटवार केला आहे. 1984च्या शीख दंगलीत असे काहीही घडले नसल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. इंदिराजींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल उसळली होती. या दंगलीच्या चौकशीसाठी नानावटी आयोग स्थापण्यात आला होता. या आयोगानेही जगदीश टायटलर यांना हिंसाचाराबाबत दोषी ठरवले होते, असंही अमरिंदर सिंह म्हणाले आहेत. 31 ऑक्टोबर 1984 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शीख विरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत हजारो लोकांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले आहे. तर या दंगलीचे दिल्लीत सर्वाधिक बळी ठरले होते.
शीख विरोधी दंगलीतील राजीव गांधींच्या भूमिकेचा जगदीश टायटलर यांच्याकडून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 9:43 PM