पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर, आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये गँगवार सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विक्की डोंगर आणि दविंदर बंबीहा गँगनंतर आता नीरज बवाना गँग देखील उघडपणे मैदानात उतरली आहे. कथितरित्या, नीरज बवाना गँगने एका फेसबूक पोस्टमध्ये, सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा निषेध करत, आपण दोन दिवसांच्या आत मुसेवालाच्या हत्येचा बदला घेणार, अशी उघड धमकी दिली आहे.
नीरज बवाना गँगने धमकी देताना, सिद्धू मुसेवाला हा आपला भाऊ होता आणि आपण दोन दिवसांच्या आत त्याच्या हत्येचा बदला घेणार, असे उघडपणे म्हटले आहे. नीरज बवानाचे नाव नुकतेच पैलवान सुशील कुमार प्रकरणातही समोर आले होते.
कोन आहे नीरज बवाना?नीरज बवाना हा दिल्लीतील बवाना गावचा रहिवासी आहे. यामुळेच त्यांच्या नावासोबत बवाना जोडले गेले आहे. नीरजवर खून, दरोडा, खंडणी, लोकांना धमकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे केवळ दिल्लीतच नाही, तर दिल्लीबाहेरील पोलीस ठाण्यांतही नोंदवले गेलेले आहेत. सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेला नीरज बवाना तुरुंगातूनच आपली गँग चालवत आहे. एवढेच नाही, तर नीरजचे गुंड त्याचे सोशल मीडिया वरील अकाउंट देखील सांभळतात.
नीरजच्या गँगबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या गँगमध्ये स्थानिक गुंडांशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील गुंडही आहेत. यांचा दरोडा, खंडणी आणि खुनाच्या गुन्ह्यांमध्ये सर्रास समावेश असतो.