अहमदाबाद : गुजरात सरकार आणि राज्यातील पाटीदार अर्थात पटेल समाजात गत ७० दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष मावळण्याची चिन्हे आहेत. ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजक हार्दिक पटेल यांनी नियोजित ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ मंगळवारपर्यंत (१५ सप्टेंबर) रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर सोमवारी हार्दिक पटेल मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना भेटणार आहेत.गुजरातचे अर्थमंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सौरभ पटेल यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर मध्यस्थी करीत हार्दिक पटेल आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ मंगळवारपर्यंत रद्द करण्यात आली आहे. सरकारने चर्चेची तयारी दाखविल्याने सोमवारी हार्दिक पटेल आनंदीबेन यांना भेटणार आहेत.रविवारी सकाळी दांडी ते अहमदाबाद अशी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ निघणार होती. या यात्रेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनास बाहेरच्या राज्यांतूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर सूत्रे हलली आणि सौरभ पटेल यांच्या मध्यस्थीनंतर चर्चेवर एकमत झाले. खुद्द सौरभ पटेल यांनीच याबाबत माहिती दिली. हार्दिक पटेल सोमवारी मुख्यमंत्री आनंदीबेन यांना भेटण्यास राजी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
‘रिव्हर्स दांडी यात्रा’ तूर्त मंगळवारपर्यंत रद्द
By admin | Published: September 14, 2015 1:46 AM