नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आज पार पडली. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिव्हर्स रेपो आणि रेपो दर जैसे थे असल्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही किंवा रिव्हर्स रेपो दरातही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्के कायम ठेवण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात कर्जासाठी दिलेला ईएमआय दिलासा सुरू ठेवण्याबाबत किंवा त्यावर अन्य काही दिलासा देण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र आजच्या बैठकीत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे EMI दिलासा मिळण्याचा कालावधी 31 ऑगस्टला संपणार आहे. बँकांनीही या मुदतवाढीचा गैरफायदा घेण्याची शक्यता वर्तविली होती. यामुळे अद्याप यावर निर्णय घेतला नसल्याचे समजते.
रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाबद्दल माहिती देताना 'आपण सध्या एका वेगळ्या परिस्थितीत काम करत आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक ही बहुधा जगातील एकमेव केंद्रीय बँक असेल जिथे कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी स्पेशल क्वॉरंटाईन फॅसिलिटी सेटअप तयार केला आहे. महत्त्वपूर्ण कामात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून हे केले गेले' असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.