नवी दिल्ली : दर दहा वर्षांनी राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने बसपा, एनसीपी आणि सीपीआय या पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे बसपा, एनसीपी आणि सीपीआयच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जावर टांगती तलवार होती. यावरून निवडणूक आयोगाने या पक्षांना २०१४ मध्ये नोटिसाही जारी केल्या होत्या. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची मान्यता देण्यासंबंधीचे निकष ‘जैसे थे’ राहणार असले तरी अशा दर्जाबाबत लोकसभा आणि विधानसभेच्या सलग दोन निवडणुकीनंतर आढावा घेतला जाणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सध्या दर पाच वर्षांनी म्हणजे एका निवडणुकीनंतर राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेतला जायचा. आता दर दहा वर्षांनी याबाबत आढावा घेतला जाईल. (वृत्तसंस्था)
राजकीय पक्षांच्या दर्जाचा दर दहा वर्षांनी आढावा
By admin | Published: August 23, 2016 6:18 AM