रायपूर (छत्तीसगढ) : नक्षलवाद्यांशी लढण्याच्या धोरणाचा सरकार फेरआढावा घेईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी येथे म्हटले. नक्षलवाद्यांचा हिंसाचार समूळ नष्ट करण्याचे मार्ग शोधण्यासाठी नक्षलग्रस्त राज्यांची बैठक ८ मे रोजी घेतली जाईल, असे सिंह यांनी सांगितले. छत्तीसगढ राज्यात सुकमा जिल्ह्यात सोमवारी सुमारे ३०० नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २५ जवानांना छुपा हल्ला करून ठार मारले. सिंह या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आले होते. राजनाथसिंह वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, आम्ही धोरणाचा फेरआढावा घेऊ व गरज भासल्यास त्याचा पुन: विचार करू. नक्षलवाद्यांचा हिंसाचार समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही काम करीत आहेत यावर त्यांनी भर दिला. हा हल्ला अतिशय शांतपणे विचार करून केलेला खून आहे, भ्याड आणि निराश होऊन केलेले कृत्य असल्याचे सिंह म्हणाले. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. हे नक्षलवादी गट विकासाच्या विरोधात असून, राज्यातील विकासाला ते अस्थिर करू पाहत आहेत, असे राजनाथसिंह म्हणाले. नक्षलवादी आदिवासींचा वापर मानवी ढाल म्हणून करीत आहेत. आमच्या शूर जवानांचे बलिदान वाया जाणार नाही, बस्तरमधील रस्त्यांच्या विकासकामांमुळे नक्षलवादी निराश झाले आहेत; परंतु ते त्यांच्या वाईट विचारांत कधीही यशस्वी होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नक्षलवाद्यांशी लढण्याच्या धोरणाचा फेरआढावा घेणार
By admin | Published: April 26, 2017 1:08 AM