(सुधारित/ आज अंत्यसंस्कार) राष्ट्रपतींच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे निधन मान्यवरांच्या शोकसंवेदना : आज दिल्लीत अंत्यसंस्कार
By admin | Published: August 18, 2015 9:37 PM
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटत असल्यामुुळे गेल्या ११ दिवसांपासून आर्मी रिसर्च ॲन्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये (लष्करी रुग्णालय)त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी १०.५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटत असल्यामुुळे गेल्या ११ दिवसांपासून आर्मी रिसर्च ॲन्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये (लष्करी रुग्णालय)त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी १०.५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्या रवींद्र संगीत गायिका होत्या. त्यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि अनेक राजकीय नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.राष्ट्रपती भवनाचे प्रवक्ते वेणु राजामोनी यांनी एका निवेदनात त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. ७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना अतिदक्षता कक्षात (आयसीयू) ठेवण्यात आले होते. त्यांच्या मागे दोन मुले काँग्रेसचे खा. अभिजित मुखर्जी आणि इंद्रजित आणि कन्या शर्मिष्ठा हे आहेत. शुभ्रा यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ७ ऑगस्ट रोेजी ओडिशाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले होते. शुभ्रा मुखर्जी यांचे पार्थिव राष्ट्रपतीभवनातील अभ्यासिकेसमोरील एडीसी कक्षात ठेवण्यात आले. अनेक मान्यवरांनी तेथे जाऊन अंत्यदर्शन घेतले. बुधवारी अंत्यसंस्कारापूर्वी पुत्र खा. अभिजित मुखर्जी यांच्या १३ तालकटोरा रोड येथील निवासस्थानी नेले जाणार असून त्याच ठिकाणाहून अंत्ययात्रा निघेल. प्रणव मुखर्जी आणि शुभ्रा यांचा विवाह १३ जुलै १९५७ रोजी झाला. शुभ्रा मूळच्या बांगलादेशच्या जेस्सोर येथील असून त्या १० वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब कोलकात्याला स्थायिक झाले होते. पदवीधर असलेल्या शुभ्रा यांचा जन्म १७ सप्टेंबर १९४० रोजी झाला होता. त्यांच्यावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव होता. त्यांनी अनेक वर्षे देशातच नव्हे तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेत रवींद्र संगीत गायन आणि नृत्य, नाटकांचे प्रभावी सादरीकरण केले होते. रवींद्रनाथांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गीतांजली संगीत समूहाची स्थापना केली होती. (वृत्तसंस्था) ---------------------------------------मान्यवरांना दु:खशुभ्रा मुखर्जी या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या सहवासात असलेल्या प्रत्येकाला त्यांच्या जाण्याने दु:ख झाले आहे.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शोकसंदेशात म्हटले. निधनाचे वृत्त ऐकताच दु:ख झाले. राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत आहे. कला, संस्कृती आणि संगीतावरील प्रेमामुळे त्या कायम स्मरणात राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. या दु:खाच्या क्षणी संपूर्ण देश राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पाठीशी उभा आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शोकसंदेशात म्हटले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.