मुंबई - बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला वर्षात तिसऱ्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले आहे. आता ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आल्याने राम रहिम मोकळा श्वास घेत असून अनेक कार्यक्रमात सहभाग होत आहे. विशेष म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राम रहीमने त्याचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज केला. दिवाळीच्या रात्री रिलीज झालेला हा व्हिडिओ यूट्यूबवर हिटलिस्टमध्ये आला आहे. गेल्या 24 तासांत म्युझिक व्हिडिओला 42 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावरुन, आता चांगलाच वादंग उठला आहे. तर, राम रहिमचा पॅरोल रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
पॅरोलवर सुटलेला गुरमीत इथेच थांबला नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो नियमितपणे ऑनलाइन सत्संग करत आहे. भाजपचे अनेक नेतेही या शिबिरात सहभागी होत आहेत. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी यावरुन खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की, हरियाणा सरकार ज्या प्रकारे पॅरोल सुविधा देत आहे, ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. मोइत्रा यांनी ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणे कोडिफाइड पॅरोलची वकिली केली, असे मोईत्रा यांनी म्हटले. तर, दिल्लीमहिला आयोगाच्या अध्यक्षांनीही हरयाणा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, राम रहिम हा बलात्कारी आणि खूनी असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
राम रहिमला न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र, हरयाणा सरकार पाहिजे तेव्हा त्याला पॅरोल देत आहे. तो सत्संग आयोजित करतो, आणि हरयाणा सरकारचे उपसभापती आणि महापौर या सत्संगाला हजेरी लावतात. त्यामुळे, सरकारने राम रहिमचा पॅरोल रद्द करावा आणि तात्काळ त्याला तुरुंगात पाठवावे, अशी मागणीही स्वाती मालीवाल यांनी केली आहे.
२० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा
राम रहीम २०१७ मध्ये लैंगिक शोषण प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. यासोबतच पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि रणजित यांच्या हत्येप्रकरणीही त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. यावर्षी पंजाब निवडणुकीपूर्वी ७ फेब्रुवारी रोजी राम रहीम २१ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर २७ जून रोजी राम रहीमला ३० दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला. दरम्यान, आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी तो सध्या 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.