ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - बंदुकीचा धाक दाखवत लग्नाच्या मंडपातून आपल्या माजी प्रियकराचं अपहरण करणा-या "रिव्हॉल्वर राणी"ला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून अद्याप नवरदेवाचा पत्ता लागलेला नाही. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा गावातील ही घटना आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील सीन शोभावा त्याप्रमाणे तरुणीने लग्नमंडपात सर्वांच्या डोळ्यादेखत आपल्या माजी प्रियकराचं अपहरण केलं होतं. यानंतर शहरभर या घटनेची चर्चा सुरु झाली होती.
लग्नाच्या मंडपातून तरुणाने आपल्या प्रेयसीचं अपहरण केल्याच्या अनेक घटना आजपर्यंत तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका तरुणीने आपल्या प्रियकराचं लग्नाच्या मंडपातून अपहरण केल्याची घटना समोर आली होती. लग्नाचा मुहूर्त अवघ्या काही मिनिटांवर आला असताना तरुणीने लग्नमंडपात प्रवेश करत बंदूक बाहेर काढली, आणि आपल्या माजी प्रियकराचं अपहरण केलं. मंगळवारी ही घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी तरुणीला अटक करण्यात आलं असलं तरी नवरदेवाचा शोध अद्याप सुरु आहे.
"मी त्याला गेल्या आठ वर्षांपासून ओळखते. मी हे लग्न होऊ देणार नाही असं त्याला स्पष्ट सांगितलं होतं. पण मी असं काही करेल याची त्याला कल्पना नसावी. खरं सांगायचं तर त्याचीही हे लग्न करण्याची इच्छा नव्हती", असं आरोपी तरुणी वर्षा साहूने सांगितलं आहे.
आरोपी तरुणी बांदा जिल्ह्याची रहिवासी असून पीडित आकाश यादवसोबत एका खासगी दवाखान्यात काम करत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. दोघांनी एकमेकांना लग्नाचं वचन दिलं होतं. पण याच दरम्यान भवानीपूरच्या एका मुलीबरोबर अशोकचं लग्न ठरलं. मौदहा येथे अशोकच्या लग्नाची तयारी सुरू होती. लग्नाच्या दिवशी अचानक ती तरूणी भरमंडपात बंदूक घेऊन आली. "प्रेम माझ्याशी केलं आणि लग्न दुसरीसोबत करतो? मी हे कधीच सहन करणार नाही," असं म्हणत कोणाला काही समजण्याच्या आत तरूणीने भरमंडपातून अशोकचे कॉलर पकडून त्याला ओढत नेऊन गाडीत कोंबले आणि पसार झाली. या दरम्यान लग्नमंडपातील वीज अचानक घालवण्यात आली होती.
भरमंडपातून एवढ्या लोकांच्या उपस्थितीत एखादी तरूणी एखाद्याचे अपहरण कसे काय करू शकते? कोणी त्या तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले असून तरूणी आणि नवरदेवाच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी अशोकचा भाऊ आणि काही फोटोग्राफर्सनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.