रिवा: मध्य प्रदेशमधील रिवा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजप नेते जनार्दन मिश्रा पुन्हा चर्चेत आहेत. पंतप्रधान आवास योजनेबद्दलचं त्यांचं विधान व्हायरल झालं आहे. या योजनेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीचा संबंध लावत मिश्रा यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. जोपर्यंत देशातील सगळ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घर मिळत नाही, तोपर्यंत मोदींच्या दाढीतून घर पडत राहतील, असं मिश्रा म्हणाले.
जनार्दन मिश्रा यांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सेमरिया विधानसभा मतदारसंघातील आहे. ४३ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये मिश्रा बघेली भाषा बोलत आहेत. 'जोपर्यंत या देशातील एक एका व्यक्तीला पीएम आवास मिळणार नाही, तोपर्यंत मोदींच्या दाढीतून घर पडत राहतील, पडतच राहतील. मोदींच्या दाढीत घरंच घरं आहेत. जोपर्यंत दाढी आहे, तोपर्यंत कोणीही घराशिवाय राहणार नाही,' असं मिश्रा म्हणाले.
'मोदींनी एकदा त्यांच्या दाढीला झटका दिल्यावर ५० लाख घरं पडतात. मोदींनी दुसऱ्यांदा दाढी हलवल्यावर १ कोटी घरं निघतात. जोपर्यंत आमदार म्हणतील, तोपर्यंत दाढीतून घरं पडत राहतील. मोदींची दाढी आणि पीएम आवास दोन्ही अमर आहेत,' असंही मिश्रा पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला सेमरियाचे आमदार के. पी. त्रिपाठी आणि सर्वसामान्य जनता उपस्थित होती. मिश्रा यांच्या विधानांवर टाळ्यांचा कडकडाट झाला.