भोपाळ - मध्य प्रदेशमधीलभाजपाचे एक खासदार आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भाजपाचे जनार्दन मिश्रा यांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूली संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्यांकडे कर्जवसूलीसाठी कोणी आलं तर त्यांचे हात तोडू आणि गळा दाबून मारून टाकू असं जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं आहे. सोमवारी पक्षाच्यावतीने 'किसान आक्रोश आंदोलना'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मिश्रा यांनी असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये सोमवारी (4 नोव्हेंबर) शेतकऱ्यांसाठी 'किसान आक्रोश आंदोलना'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाजपाचे जनार्दन मिश्रा यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'काँग्रेस अथवा पोलिसांपैकी कोणीही शेतकऱ्यांकडे कर्जवसूलीसाठी आले तर त्यांचे हात तोडू, गळा दाबून मारून टाकू' असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. याआधीही मिश्रा यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत.
जनार्दन मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये आयएएस यादव यांना जिवंत गाढण्याची धमकी दिली होती. 'आयुक्त तुमच्याकडे आले आणि त्यांनी पैसे मागितले तर मला बोलवा. मी येईन आणि खड्डा खणून त्यांना जिवंत गाढेन' असं एका बैठकीत मिश्रा यांनी म्हटलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा जनार्दन मिश्रा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपाचे नेतेमंडळी सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत.
भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आता एक अजब विधान केलं आहे. 'सुशिक्षित असलेले जे लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी श्वानाचे मांस खावे. ते आरोग्यासाठी चांगलं असतं' असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. बर्दवानमध्ये गोप अष्टमीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात घोष यांनी हे अजब विधान केलं आहे. भाजपाच्या दिलीप घोष यांनी फक्त श्वानच नाही तर आणखी प्राणी आहेत त्यांचं देखील मांस खा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? मात्र तुम्ही घरी भोजन करा असं म्हटलं आहे. तसेच 'गाय आपली माता आहे आणि गायीला मारणं असामाजिक आहे. समाजात असे अनेक लोक आहेत जे घरामध्ये विदेशी श्वान पाळतात. तसेच त्यांचे मलमूत्र देखील साफ करतात. मात्र हा मोठा अपराध आहे' असं घोष यांनी म्हटलं आहे.
'भारत हे भगवान कृष्णाचे स्थान आहे आणि येथे गायींप्रति नेहमीच सन्मान आणि आदर असतो. गायीच्या दूध पिऊन मुलं जगतात. गाय आपली आई आहे. त्यामुळे हिला कोणी मारलं तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही' असं देखील बर्दवानमधील कार्यक्रमात घोष यांनी म्हटलं आहे. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली आहे. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे.