मेरठ पोलिसांच्या इंटेलिजेन्स टीममध्ये तैनात असलेल्या एका महिला इन्स्पेक्टरला जखमी अवस्थेत एक पोपट सापडला. त्यांनी पोपटाला घरात ठेवून उपचार करून घेतले. त्यानंतर पोपट घरातून उडून गेला. आता तो पोपट सापडत नाही. यानंतर महिला इन्स्पेक्टरने जो कोणी त्यांचा पोपट शोधून काढेल त्याला 5,000 रुपयांचे बक्षीस मिळेल अशी घोषणा केली आहे.
वास्तविक, मेरठ एलआययूमध्ये इन्स्पेक्टर म्हणून तैनात असलेल्या श्वेता यादव मोहनपुरा भागात राहतात. एप्रिल महिन्यात त्यांना एक पोपट जखमी अवस्थेत सापडला, कुत्र्याने तो तोंडात पकडला होता, पोपटाचा पाय मोडला होता. श्वेताने जखमी पोपटाला आपल्या घरी आणून उपचारासाठी डॉक्टरांना दाखवला. पोपटावर उपचार करण्यात आले, त्यानंतर पोपट पूर्णपणे निरोगी झाला.
श्वेता य़ांनी पोपटाचं नाव मिष्ठू असं ठेवलं होतं. पोपटाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपलं जात होतं. श्वेता सांगते की, पोपट पिंजऱ्यात ठेवला नव्हता, तो घरात असायचा. संपूर्ण कुटुंब मिष्ठूवर प्रेम करू लागलं होतं. श्वेता सांगतात की, त्या पोपटाला सोबत घेऊन जायच्या. 11 ऑगस्ट रोजी सकाळी पोपट घरातून अचानक गायब झाला. श्वेता यांनी शोधाशोध केली, पण पोपट सापडला नाही.
आता श्वेता यांनी मिष्ठूचा शोध घेणाऱ्याला पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. त्या म्हणतात की, पोपट फिरत असेल तर योग्य आहे, पण जर कोणी त्याला पकडून पिंजऱ्यात बंद केलं असेल तर त्यांना खूप वाईट वाटेल. पोपट परत आणणाऱ्याला त्या पाच हजार रुपयांचे बक्षीस देतील. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक लोक पोपट घेऊन पोहोचले, मात्र तो पोपट महिला इन्स्पेक्टरचा नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.