नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन बुधवारी भारतात दाखल झाले आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यानंतर टिलरसन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिलरसन यांच्यासमोर पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा मांडला. मिळालेल्या माहितीनुसार, टिलरसन यांच्या भारत दौ-याच्या अजेंड्यामध्ये भारत-अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याशिवाय आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनचा वाढत्या प्रभावाला विरोध दर्शवण्याच्या प्रयत्नांचाही समावेश आहे. दरम्यान, भारतासोबतचे संबंध अमेरिकेसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत याची झलक टिलरसन यांनी आपला भारत दौरा सुरू होण्यापूर्वीच पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या धरतीहूनच त्यांनी पाकिस्तानकडून भारताविरोधात होणा-या दहशतवादी कारवाया न थांबल्यानं नाराजी जाहिररित्या व्यक्त केली.
पाकिस्तान दौ-यानंतर टिलरसन मंगळवारी रात्री भारतात दाखल झाले. दक्षिण आशियातील आपला पहिला दौरा सुरू करण्यापूर्वी टिलरसन यांनी आक्रमक धोरणांवरुन चीनवर टीका केली. तर दुसरीकडे, दहशतवादी कारवाया रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानलाही खडेबोल सुनावले. पाकिस्तानातील सक्रिय दहशतवादी कारवायांचा खात्मा करण्यासाठी देशाला आणखी प्रयत्न करावे लागतील, असा पुर्नउच्चार करत टिलरसन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलेत.
गेल्या दोन महिन्यात भारतात येणारे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनातील टिलरसन हे दुसरे सर्वोच्च अधिकारी आहेत. गेल्या महिन्यात अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारतात आले होते. दरम्यान टिलरसन यांचा तीन दिवसांच्या भारत दौ-यात अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा-बैठका होणार आहेत.