पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका न्यायालयाने येथील सरकारी रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. संजय रॉयला २० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश संतप्त झाला होता. विविध राज्यातील डॉक्टरांनी एकजूट करून संप केला. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर डॉक्टर कामावर परतले.
ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी संजय रॉयच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. कोर्टात हजर होताच संजय रॉय ढसाढसा रडायला लागल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रकरणाशी संबंधित वकील कोर्ट रूममध्ये उपस्थित होते, तर आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर केलं होतं. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा संजय रडायला लागला. स्टेट लीगल असिस्टेंटने नियुक्त केलेल्या रॉयच्या वकिलाने जामिनाची विनंती केली आणि सांगितलं की संजयला फसवलं गेलं आहे.
सीबीआयचे वकील आले ४० मिनिटं उशिरा
दुसरीकडे, ४० मिनिटं उशिराने न्यायालयात पोहोचलेल्या सीबीआयच्या वकिलाने या प्रकरणाच्या तपासात अडथळे येत असल्याचे सांगत जामीन अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी रॉयला१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी, न्यायाधीशांनी सीबीआय तपास अधिकारी (IO) आणि वकील यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय एजन्सी या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयचे वकील न्यायालयात उशिरा पोहोचल्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला.
तृणमूल काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तपास अधिकारी कुठे होते? वकील कुठे होते... ते कुठेच दिसत नव्हते. याप्रकरणी सीबीआयची ही पूर्णपणे उदासीनता आहे. हे जाणूनबुजून न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणणारे आहे, ज्यामध्ये सीबीआय भाजपाच्या विश्वासू मित्राची भूमिका बजावत आहे, ९ ऑगस्ट रोजी सकाळी पोलिसांना आरजी कर मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एका ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडला. त्यानंतर संजय रॉयला कोलकाता पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली होती.