कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामधील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामधील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या संजय रॉय याची सीबीआयने पॉलिग्राफ टेस्ट केली होती. मात्र त्या चाचणीच आरोपीने दिलेल्या उत्तरांमुळे या प्रकरणातील गुढ अधिकच वाढलं आहे.
सीबीआयने आरोपी संजय रॉयला तू कुणावर बलात्कार केला होतास का असा प्रश्न पॉलीग्राफ टेस्टमध्ये विचारला होता. त्याला त्याने नाही असं उत्तर दिलं. मात्र आरजी कर रुग्णालयात गेला होतास का असं विचारला असता त्याने होकारार्थी उत्तर दिलं. तसेच का गेला होतास असं विचारल्यावर त्याने कामासाठी गेलो होतो असं सांगितलं. त्यानंतर तिथे कुणी होतं का, असं विचारलं असता त्याने तिसऱ्या मजल्यावर कुणी नव्हतं असं उत्तर दिलं. तसेच तू तिचं नाक आणि तोंड दाबलं होतंस का? असं विचारलं असता संजय रॉय याने हो असं उत्तर दिलं. मात्र आपल्या सोबत कुणी नव्हतं असं त्याने सांगितलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला बलात्कार केला होतास का, असा प्रश्न पुन्हा विचारला. त्याला त्याने नकारार्थी उत्तर दिलं.
दरम्यान, या पॉलिग्राफ टेस्टनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संजय रॉयने त्या महिला डॉक्टरची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. मात्र बलात्कार केला नसल्याचंही तो म्हणाला. त्यामुळे या प्रकरणात अन्य कुणाचा सहभाग होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र फॉरेन्सिक अहवालामधून हा बलात्कार संजय रॉय यानेच केला असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र संजय रॉय याने बलात्काराच्या कबुलीवरून मारलेल्या पलटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.