नवी दिल्ली - भारतामध्ये कोट्यधीशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. गेल्या एका वर्षात कोट्यधीशांच्या संख्येत तब्बल 7,300 नवीन कोट्यधीशांची भर पडली आहे. क्रेडिट स्विसने दिलेल्या अहवालानुसार, 7,300 लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या आता 3.43 लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांकडे 6 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 441 लाख कोटींची एकूण संपत्ती आहे. तसेच या अहवालात भारतात सर्वाधिक कोट्यधीशांमध्ये महिलांची संख्या ही अधिक असल्याचं सांगण्यात आले आहे.
भारतातील नव्या कोट्यधीशांपैकी 3,400 जणांकडे 5-5 कोटी डॉलर्स म्हणजेच 368-368 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तर 1500 जणांकडे 10-10 कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास 736-736 कोटी रुपयांची संपत्ती आहे. डॉलर्सच्या तुलनेत देशाच्या एकूण संपत्तीमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे 6,000 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. 2023 पर्यंत भारतात कोट्याधीशांच्या संखेत मोठी वाढ होणार आहे. 5,26,000 लोक कोट्याधीश होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे 8,800 अब्ज डॉलर्सची संपत्ती असणार आहे.