कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पंजाबच्या लोहगड गावातील गुरदेव सिंग यांचंही नशीब रातोरात पालटलं आहे. गुरदेव सिंग यांनी खूप गरीब असूनही मेहनत सोडली नाही आणि रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले आणि आज त्यांना त्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. लॉटरीच्या स्वरुपात त्यांना हे फळ मिळालं आहे. मोगा जिल्ह्यातील लोहगड येथील रहिवासी असलेल्या रिक्षाचालक गुरदेव सिंग यांनी बंपर लॉटरीमध्ये 2.5 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले.
माजी आमदार सुखजित सिंग काका लोहगड यांनी कुटुंबीयांना मिठाई खाऊ घालून अभिनंदन केले. गरीब कुटुंबातील गुरदेव सिंग आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवत होते. गुरदेव सिंग यांच्या कुटुंबात आता आनंदाचे वातावरण आहे. देव जेव्हा एखाद्याला देतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो असं म्हणतात. असंच काहीसं गुरदेव सिंगसोबत घडलं आणि ते रातोरात करोडपती झाले.
गुरदेव सिंग यांनी बंपर लॉटरी जिंकली आणि ते करोडपती झाले. मला लॉटरी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. देवाने हे माझ्या मेहनतीचे कौतुक केलं आहे, असे गुरदेव सिंग यांनी सांगितलं. या पैशातून मी माझ्या मुलांसाठी घर बांधून माझ्या नातवंडांना चांगले शिक्षण देईन असंही गुरदेव म्हणाले. रिक्षा चालवण्यासोबतच गुरदेव सिंग स्वत: रस्त्यांवरील खड्डे बुजवायचे आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी चांगला मार्ग तयार करायचे.
आज गुरदेव सिंग यांचे चारही मुलगे आणि सुनांच्या व्यतिरिक्त नातवंडांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. सोबतच नातेवाईकांनी सांगितले की, वडिलांच्या माध्यमातून देवाने आमच्या घरची गरिबी दूर केली आहे. या आनंदाच्या प्रसंगी, धर्मकोट विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुखजित सिंग काका यांनी बंपर लॉटरीसाठी अडीच कोटी रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकल्याबद्दल गुरदेव यांचे अभिनंदन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"