ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - उघडयावर लघुशंका करु नका, त्याऐवजी जवळच्या शौचालयात जा असा सल्ला दिल्यामुळे दिल्लीत एका तरुण रिक्षाचालकाला आपले प्राण गमवावे लागले. रवींद्र कुमार असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. उघडयावर लघुशंका करण्यापासून दोन तरुणांना रोखणा-या रवींद्र कुमारला तरुणांच्या गटाने विटा आणि अन्य हत्यारांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रवींद्र कुमारचा दुर्देवी मृत्यू झाला.
शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या मुखर्जीनगर भागात ही घटना घडली. जीटीबी नगर मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 4 जवळ ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी दुपारी 1.30 च्या सुमारास रवींद्र त्याची रिक्षा पार्क करुन दुपारच्या जेवणासाठी मित्रांची वाट पाहत उभा होता. त्यावेळी सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर दोन तरुण लघुशंका करताना त्याच्या नजरेस पडले. त्यांच्या हातात बिअरचे कॅन होते. रवींद्र त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना इथे लघुशंका करु नका. ही आमची रोजची जेवायला बसण्याची जागा आहे असे त्याने सांगितले.
जेव्हा त्या तरुणांनी वाद घालायला सुरुवात केली तेव्हा रवींद्रने त्याच्या खिशातून पैसे काढले व त्यांचे शौचालयाचे पैसे भरण्याची तयारी दाखवली असे प्रत्यक्षदर्शी मनोजने सांगितले. त्यावेळी या दोन तरुणांनी आज रात्रीपर्यंत तुला धडा शिकवतो अशी धमकी रवींद्रला दिली.
त्याच दिवशी दुपारी 3.30 च्या सुमारास ते दोन तरुण पुन्हा तिथे आले व हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस कोण होता म्हणून चौकशी करत होते अशी माहिती दुसरा रिक्षाचालक तोता राम याने दिली. ते रवींद्रबद्दल चौकशी करतायत ते आम्हाला त्यावेळी माहिती नव्हते. जेव्हा रवींद्र स्टँडवर आला तेव्हा त्याचे हिरवे शर्ट पाहून ते रवींद्रबद्दल चौकशी करत असल्याचे आम्हाला समजले असे तोता रामने सांगितले.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हे दोन तरुण पुन्हा तिथे आले. त्यावेळी आणखी 20 ते 25 जण त्यांच्यासोबत होते. रवींद्र काहीजणांसोबत तिथे बोलत उभा होता. त्यांनी सरळ रवींद्र घोळक्यातून खेचले व मारहाण सुरु केली. त्यांनी विटांनी प्रहार केले. काहीजणांना त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा मारहाण केली असे तोता रामने सांगितले. संध्याकाळी 7.30च्या सुमारास घटना घडली त्यावेळी योगायोगाने तोताराम सुद्धा तिथे होता. रवींद्रला कुठली मदत मिळण्याआधी हल्लेखोर तिथून पसार झाले होते. रवींद्र रक्ताच्या थारोळयात रस्त्यावर पडला होता. पाहणा-यांसाठी हा सर्व प्रकार धक्कादायक होता.