शीलेश शर्मानवी दिल्ली : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये निर्माण झालेला दुरावा आणखी वाढला आहे. पायलट यांच्याशी मतभेद संपुष्टात यावेत यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिलेला प्रस्ताव गेहलोत यांनी मान्य केला नाही.
हा प्रस्ताव पक्षाध्यक्षांच्या वतीने काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी गेहलोत यांना सादर केला. पायलट समर्थकांना गेहलोत यांनी कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्री करावे व सचिन पायलट यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात येईल असे या प्रस्तावात म्हटले आहे. आपल्या मागण्या पंधरा दिवसांत मान्य कराव्यात असे पायलट यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितले आहे.
मुख्यमंत्री भूमिकेवर ठाम
सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांंना कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या सोपवू नये या भूमिकेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत ठाम आहेत. त्यांच्याशी सोनिया गांधी व राहुल गांधी हे लवकरच थेट चर्चाही करणार आहेत. पायलट आपल्या समर्थक आमदारांसह दुसऱ्या पक्षात गेले तरी आपल्या सरकारला काहीही धोका निर्माण होणार नाही व आवश्यकता भासल्यास सरकारचे बहुमत सिद्ध करू असा गेहलोत यांना विश्वास आहे.