लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा फूट पडली आहे. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव या शनिवारी समाजवादी सेक्युलर मोर्चाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शिवपाल यादव आणि अपर्णा यादव एकाच मंचावर आल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमात अपर्णा यादव यांनी, समाजवादी सेक्युलर मोर्चाला मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच समाजवादी सेक्युलर मोर्चा भक्कम होईल, तसेच मी स्वत: काका शिवपाल यांच्यासोबत उभी राहीन, असे त्यांनी सांगितले. शिवापाल यादव शनिवारी लखनौ येथे राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पार्टीच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अपर्णा यादव सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शिवपाल आणि अपर्णा यादव यांचे एकाच मंचावर एकत्र येणे हे उत्तर प्रदेशमधील बदललेल्या साजकीय समीकरणांचा नमुना मानला जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शिवपाल यादव यांनी कुटुंबातील दोन दिग्गजांना आपल्या बाजूने उभे केले आहे. यावेळी कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? असे विचारले असता अपर्णा यादव यांनी याबाबत काका शिवपाल यादव माहिती देतील, असे सांगितले. तर शिवपाल यादव यांनी आम्ही आपल्या पक्षासोबत काही छोट्या पक्षांना घेऊन चांगले काम करण्यासाठी निघालो आहोत. समान विचारसणीचे लोक एकत्र येतील. तसेच शेतकरी, तरुणा णि मुस्लिमांचे जे प्रश्न आहेत ते दूर करण्याचे काम आमचा पक्ष करेल, असे सांगितले.