खुशालचंद बाहेती -नवी दिल्ली : विद्यापीठातील प्राध्यापकांना या पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण केलेल्या तारखेच्या प्रभावाने पदोन्नती मिळण्याचा अधिकार आहे, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. (Right to Promotion from Eligibility to Professor, Delhi High Court)दिल्ली विद्यापीठाच्या विधि विभागाच्या सहयोगी प्राध्यापकांनी २०१७ मध्ये प्राध्यापक पदाची पात्रता मिळाल्यानंतर पदोन्नतीसाठी अर्ज केले. २०१९ मध्ये त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड समितीने ९ जणांच्या मुलाखती घेतल्या. यापैकी ८ जणांची शिफारस केली. हे करताना ३ जणांना पात्रतेच्या तारखेपासून, तर ५ जणांना मुलाखतीच्या तारखेपासून पदोन्नती देण्याची शिफारस निवड समितीने केली. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने यास मान्यता दिली व त्याप्रमाणे आदेश निघाले.उशिरा पदोन्नती मिळणाऱ्या ४ उमेदवारांनी यास दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीप्रमाणे पदोन्नतीची तारीख ही पात्रता मिळाल्यापासून असणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. त्याला प्रत्युत्तर देताना विद्यापीठाने, निवड समितीचा निर्णय पदोन्नतीच्या बाबतीत अंतिम असतो, ते प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र विचार करून निर्णय घेतात, असा मुद्दा मांडला. विद्यापीठ अनुदान आयोग मात्र दिल्ली विद्यापीठाशी सहमत झाले नाही. त्यांनी युजीसीच्या नियमाप्रमाणे पात्रतेची तारीख हीच पदोन्नतीची तारीख योग्य असल्याचे मत व्यक्त केले. न्या. व्ही. कमलेश्वर राव यांनी विद्यापीठाचा निर्णय अन्यायकारक असल्याचे ठरवत, सर्वांना पात्रतेच्या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती देण्याचे आदेश दिले.
काय आहे नियम...२०१० मध्ये युजीसीने विद्यापीठातील शिक्षण देणाऱ्या पदांच्या सेवा शर्तीत नियम जारी केले. २०१४ च्या आदेशाप्रमाणे सर्व पदोन्नती या करिअर ॲडव्हान्स स्कीम (CAS) प्रमाणेच होतील, असा नियम बनविला.
CAS 2010 च्या ६.३.१२ ची तरतूदउमेदवाराने पात्रता प्राप्त झाल्यानंतर पदोन्नतीसाठी अर्ज दिल्यास आणि यात तो यशस्वी ठरल्यास पदोन्नतीचा प्रभाव किमान पात्रता मिळालेल्या तारखेपासून राहील.