- सचिन लुंगसे मुंबई : मोबाइल, इलेक्ट्रिक वस्तू, दिवाणखाने सजवणारी झुंबरे, लाइट फिटिंग्ज, लहान मुलांची खेळणी... देवदेवतांच्या चिनी छापाच्या मूर्ती यासारख्या प्रत्येक क्षेत्र व्यापणाऱ्या साहित्यातून भारतातील प्रत्येक बाजारपेठेला चिनी ड्रॅगनचा विळखा पडला आहे. ही उलाढाल तब्बल १० हजार कोटींची आहे.वापरा आणि फेकून द्या, या छापाच्या वस्तू आणि वर्गाच्या खिशाला परवडणाऱ्या किंमती यामुळे भारतीयांना त्याची भुरळ पडत असली तरी त्याद्वारे चिनी मालाने ७२ ते ७५ टक्के बाजारपेठ व्यापली आहे. चीनच्या कब्जातून बाहेर पडण्यासाठी सरकार, विविध धोरणे व्यापारी यांच्याबरोबरच ग्राहकांनीही पुढाकार घ्यायला हवा. ते केल्यास ड्रॅगनच्या विळख्यातून बाहेर पडणे शक्य होईल.चिनी मालावर ग्राहकांनीच बहिष्कार घालावा. तरच हा विळखा सैल होईल, असा व्यापारी संघटनांचा दावा आहे. फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी मॅन्युफॅक्चरर्स अॅन्ड ट्रेडर्स असोएशनचे अध्यक्ष पारस शाह यांनी सांगितले की, स्टेशनरीतील पेपर इंडस्ट्रीत चीनचा वाटा ५ टक्के आहे. पण पेन-बॉलपेनच्या दहा टक्के बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व आहे. स्टिकर्स, आर्ट्स आणि क्राफ्टची ७५ टक्के बाजारपेठ चीनच्या कब्जात आहे. शालेय साहित्यातील रबर, पट्टी, पेन्सिलसारख्या वस्तू, आॅफिस स्टेशनरीच्या ५० टक्के मालावर चीनचे वर्चस्व आहे. चीनने भारतीय खेळण्यांची बाजारपेठ पूर्णत: नष्ट केली आहे. स्कूल बॅग, लॅपटॉप बॅगपैकी ५० टक्के उत्पादने चीनमधून येतात.चीनने बाजारपेठेचा मोठा हिस्सा व्यापला आहे. मोबाइलपासून इलेक्ट्रिक साहित्यापर्यंत तो पसरला आहे. महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला तो मीठ उचलून. त्याचपद्धतीने चिनी वस्तू खरेदी करणार नाही, यापद्धतीने प्रतीकात्मकता दाखवत तुम्ही एक संदेश देऊ शकता. यातून लगेच चिनी बाजारपेठेला हादरा देता येणार नाही. पण वेगळे व कायमस्वरूपी उपाय शोधायला हवेत, हे निश्चित.- शिरीष देशपांडे, प्रमुख, मुंबई ग्राहक पंचायत
चीनच्या कब्जातून बाहेर येण्याची हीच आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 4:52 AM