पाटणा, दि. 17 - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्या सर्व आरोपांना मी योग्य वेळी उत्तर देईन असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले. त्यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे हित लक्षात घेऊनच आपण भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या आरोपासंबंधी नितीश कुमारांना पत्रकारांनी विचारले त्यावेळी त्यांनी योग्यवेळी उत्तर देऊ असे सांगितले. बिहारचा विकास आणि न्याय यांना आपले पहिले प्राधान्य असेल असे नितीश म्हणाले. बिहारची जनता आणि बिहारच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मी बिहारची सेवा करत राहीन असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान याआधी लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली.
'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं.
'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.