ऑनलाइन लोकमत
अलाहाबद, दि. ४ - बलात्कारातून जन्म झालेल्या मुलालाही त्याच्या बायोलॉजिकल पित्याच्या (बलात्कार करणारी व्यक्ती) संपत्तीत वाटा मिळू शकतो असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबादमधील हायकोर्टाने दिला आहे. मात्र त्या मुलाला एखाद्या दाम्पत्त्याने दत्तक घेतल्यास त्या मुलाला हा अधिकार राहणार नाही असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
उत्तरप्रदेशमधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला व या बलात्कारानंतर पिडीत मुलगी गर्भवती झाली होती. पिडीत मुलीच्या वतीने कोर्टाकडे गर्भपाताची परवानगी मागितली होती. मात्र गर्भपात केल्यास पिडीतेच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञानी दिला होता. त्यामुळे पिडीतेला गर्भपात करता आला नाही व नुकतेच तिने एका चिमुरडीला जन्म दिला. पिडीत मुलगी गरीब घरातील असल्याने तिच्या मुलीला बायोलॉजिकल पित्याच्या संपत्तीत अधिकार मिळू शकतो का यावर कोर्टाने मत मांडले आहे. या प्रकरणातील नवजात मुलीला दत्तक दिले जाईल. पण जर तिला दत्तक घेतले गेले नाही तर पर्सनल लॉनुसार त्या नवजात मुलीला तिच्या पित्याच्या संपत्तीत वाटा मिळू शकतो असे हायकोर्टाने म्हटले आहे.