गोरखपूर, दि. 13 - बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिला. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने झालेल्या या दुर्घटनेत 70 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. लहान मुलांसाठी काळ ठरलेल्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजला योगी आदित्यनाथ यांनी आज भेट दिली. त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा त्यांच्यासोबत होते. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात जो दोषी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल." योगी यांनी इंसेफलाइटिसमुळे झालेल्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले. यावेळी भावूक झालेल्या योगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतीत असल्याची तसेच त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये 70 बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यात नवजात बालकांची संख्याही मोठी आहे. मृत्यू झालेल्या 17 नवजात बालकांपैकी बऱ्याच बालकांना जन्मताच फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती. त्यानंतर ज्या डॉक्टरांनी त्यांना रुगालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांनी या मुलांना नियमित ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, नेमके हे मृत्यू कशामुळे झाले, हे सांगण्यास सरकार तयार नाही, तसेच मृतांचे पोस्टमार्टेमही करण्यात आले नाही, असे समजते.
गोरखपूर बालमृत्यू प्रकरणाती दोषींवर करणार कठोर कारवाई - योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 2:42 PM