मुंबई - शेतकरी आदोलनावरुन सोशल मीडियावर विशेषत: ट्विटर वॉर चांगलंच गाजत आहे. अमेरिकेची पॉपस्टार गायिका रिहानाने एक ट्विट केल्यानंतर देशातील सेलिब्रिटींनी आणि दिग्गज क्रिकेटर्संनी देशाची एकता आणि अखंडता याबद्दल ट्विट केले. त्यामुळे, या दिग्गजांना ट्रोल करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे रिहानाच्या त्या ट्विटला गेल्या वर्षभरातील सर्वाधिक रिट्विट मिळाले आहेत. त्यामुळे, रिहाना ही भारविरोधी असून ती पाकिस्तानची फॅन असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. तसेच, पैसे घेऊन ती ट्विट करते, असेही सांगण्यात येते. मात्र, रिहानाच्या पाकिस्तानी झेंड्यासोबतच्या फोटोमागील सत्य समोर आलं आहे.
रिहानाने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानचा फ्लॅग हातात घेऊन टीमला समर्थन दिल्याच तीचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, तो फोटो बनावट असून मॉर्फ म्हणजेच एडिटेड असल्याचं स्पष्ट झालंय. द लॉजिकल इंडियन या इंग्रजी वेबसाईटनेही यांसंदर्भात वृत्त दिलंय. उत्तर प्रदेशचे भाजप प्रवक्ता शलभ मनी त्रिपाठी आणि भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता अभिषेक मिश्रा यांचा रिहानाचा तो फेक फोटो व्हायरल करण्यामागे हात होता. रिहानाचा हा फोटो पहिल्यांदा मिश्राने ट्विट केला. त्यानंतर त्रिपाठीने रिट्विट केला. त्यामुळे, रिहानाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र, अनेकांनी या फोटोचं सत्य शोधून रिहानाला पाकिस्तानी हितचिंतक म्हणणाऱ्यांना उघडं पाडलं आहे.
गुगल रिव्हर्स सर्चमध्ये हा फोटो शेअर केल्यानंतर आयसीसीचं जुलै २०१९ मधलं एक ट्विट समोर येते. आयसीसीने ट्विट केलेल्या फोटोमध्ये रिहानाने वेस्ट इंडिजचा झेंडा हातात घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. २०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात रिहानाने वेस्ट इंडिज संघाला पाठिंबा दिला होता. त्यादरम्यानचा रिहानाचा हा फोटो असून तो एडिट करून व्हायरल केला जात आहे.