कोहिमा - नॅशनालिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नैफियु रिओ यांनी गुरुवारी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल पद्मनाभआचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्रीपदी भाजपाचे वाय. पॅट्टन यांनाही शपथ दिली गेली. राज्यपालांनी रिओ यांना सभागृहात १६ मार्चला बहुमत सिद्ध करून दाखवण्यास सांगितले आहे.रिओ यांचा पक्ष राज्यात भाजपासोबत पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्सच्या नावाखाली सत्तेत आला आहे. ‘आम्ही बदल घडवू, आम्ही सगळ्या घटकांसाठी काम करू. आम्ही कोणालाही मागे राहू देणार नाही,’ असे रिओ शपथविधीनंतरच्या भाषणात म्हणाले. आचार्य यांनी दहा मंत्र्यांनाही पदाची शपथ दिली, त्यात सहा जुने आहेत. ६० सदस्यांच्या विधानसभेत ३२ आमदारांच्या पाठिंब्यावर रिओ यांनी सरकार स्थापन करण्यासाठी ४ मार्च रोजी दावा केला होता.
रिओ चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:52 AM