चंदीगढ : हरियाणामधील भाजपचे ज्येष्ठ मंत्री रणजित चौटाला यांनी दिल्लीतील हिंसाचाराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीत दंगली होत आहेत. तेथे या आधीही दंगली झाल्या आहेत. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हाही संपूर्ण दिल्ली पेटली होती. हा जीवनाचा एक भागच आहे, असे वक्तव्य चौटाला यांनी केले आहे.
हरियाणा विधानसभेबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. रणजित सिंह हरियाणा सरकारचे ऊर्जामंत्री आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. निवडणुका होताच त्यांनी सत्तेसाठी काही जागा कमी पडत असलेल्या भाजपाला पाठिंबा दिला होता. यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली होती.
रणजित चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांचे पूत्र असून ओमप्रकाश चौटाला यांचे धाकटे बंधू आहेत. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून सीएएविरोधात दिल्लीत प्रचंड हिंसाचार सुरू आहे. यात मृतांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. जखमींची संख्या 250 च्या वर गेली आहे. हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने कठोर टिप्पण्या केल्या आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कार्यभार स्वीकारला आहे. हिंसाचारग्रस्त भागाची त्यांनी पाहणी करून गृहमंत्री अमित शहा यांना परिस्थितीबद्दल माहिती दिली. सध्या दिल्लीत नागरी सैन्याच्या 45 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.