नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यातील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशात दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात हिंसाचाराचे नाव बदलून मास्टरस्ट्रोक ठेवले आहे. सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट केले आहे की, सरकार तेच. घटनाही त्याच. काही वर्षांपूर्वी एका बलात्कार पीडितेने भाजप आमदाराविरुद्ध आवाज उठविला होता. त्यावेळी तिला आणि तिच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका महिलेचा अर्ज रोखण्यासाठी भाजपने सर्व सीमा ओलांडल्या.
हिंसाचार कुठे?उत्तर प्रदेशात ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्यावेळी गुरुवारी अनेक ठिकाणी हिंसाचार, गोळीबाराच्या घटना घडल्या. कन्नौज, सीतापूर, उन्नाव, लखीमपूर खिरी, गोरखपूर, बहराइजमध्ये हिंसाचार झाला.