नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांमध्ये जीएसटी दर कमी केले जाऊ शकतात, असे संकेत मोदी सरकारकडून देण्यात आले आहेत. जीएसटीच्या माध्यमातून एप्रिलमध्ये सरकारला 1 लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळालं आहे. सरकारला जीएसटीतून जास्त उत्पन्न मिळाल्यानं ललकरच जीएसटी दर कमी केले जाऊ शकतात. 'सरकारचा महसूल वाढत असल्यास, त्याचा फायदा ग्राहकांनादेखील दिला जाईल,' असं हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी म्हटलं. मोदी सरकारनं मंगळवारी जीएसटीतून मिळालेल्या उत्पन्नाचे आकडे जाहीर केले. एप्रिलमध्ये सरकारला जीएसटीतून 1 लाख 3 हजार 458 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. सरकारला 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्यानं लवकरच जीएसटी दर कमी केले जाण्याची शक्यता आहे. पीयूष गोयल यांनी शनिवारी याबद्दलचे संकेतही दिले. 'सरकारचा महसूल वाढल्यास त्याचा लाभ ग्राहकांना दिला जाईल. महसूल वाढल्यानं वित्तीय तूट कमी होईल. त्यामुळे विकास प्रकल्प, पायाभूत सोयीसुविधांसाठी अधिक रक्कम खर्च करता येईल,' असं गोयल म्हणाले. जीएसटीमुळे विकास दर वाढल्याचं गोयल यांनी सांगितलं. 'विविध प्रकारचे कर, उपकर हटवल्यानं विकास दरात वाढ झाली आहे. जीएसटीच्या माध्यमातून मिळणारं यंदाच्या वर्षातील उत्पन्न 13 लाख कोटी रुपये असू शकतं. ई-वे बिलचा डेटा आल्यावर आणखी दिलासा मिळू शकतो,' असं गोयल म्हणाले. जुलै 2017 नंतर सरकारनं 320 वस्तूंवरील कर कमी केले होते. यातील बहुतांश वस्तूंवर 28 टक्के कर होता. याशिवाय लवकरच सिमेंट आणि पेंटवरील करदेखील कमी केला जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीही 28 टक्क्यांचा टप्पा हटवण्याची गरज व्यक्त केली होती.
लवकरच जीएसटी दर कमी होणार; मोदी सरकारकडून 'अच्छे दिनां'चे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 4:59 PM