Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर सरकारला आली जाग; एका रात्रीत केली 'त्या' रस्त्याची दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 08:48 PM2023-01-01T20:48:33+5:302023-01-01T20:49:01+5:30
Rishabh Pant Accident: टीम इंडिया स्टार क्रिकेटर रिषभ पंतचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. सध्या त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिषभ पंत शुक्रवारी भीषण अपघातात जखमी झाला. या दुर्घटनेला 48 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी या अपघातामागील कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नरसन येथील महामार्गावर झालेल्या या अपघाताच्या कारणाबाबत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. उत्तराखंड पोलीस रिषभ पंतच्या वक्तव्याच्या आधारे अपघाताचे कारण सांगत आहेत.
याउलट डीडीसीएचे प्राधिकरण या अपघाताचे कारण रस्त्यावरील खड्डे असल्याचे सांगत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, खड्डे टाळताना रिषभच्या कारचा अपघात झाला. रविवारी रुग्णालयात रिषभ पंतची भेट घेतल्यानंतर पुष्कर सिंग धामी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे तसेच महामार्गावरील बंधाऱ्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. यासोबतच महामार्गाची सर्व्हिस लेनही अद्याप तयार झालेली नाही, अशा स्थितीत अपघात होणे स्वाभाविक आहे.
अपघातानंतर प्रशासनाला जाग आली
अपघातस्थळ हे मृत्यूचे ठिकाण बनल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणाभोवती शेकडो अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, मात्र कोणीही काही करायला तयार नाही, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. आता ताजी माहिती अशी की, ज्या ठिकाणी ऋषभचा अपघात झाला, तिथए महामार्ग प्राधिकरणाने एका रात्रीत दुरुस्ती केली आहे.
स्थानिक काय म्हणाले?
या ठिकाणी अनेक अपघात झाले असून हे ठिकाण मृत्यूचे ठिकाण बनल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. जेव्हा वाहने वेगाने येतात तेव्हा लेन लहान असल्यामुळे वाहनचालकाला ब्रेक लावमे कठीण जाते. वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची शक्यताही जास्त असते. अपघातानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्याच ठिकाणी असलेले खड्डे रातोरात भरण्यात आले आहेत.