नवी दिल्ली : क्रिकेटर ऋषभ पंत याला झालेल्या कार अपघातासह अनेक घटनांचे वृत्त देताना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियंत्रण कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्या खासगी वृत्तवाहिन्यांना केंद्र सरकारने कडक शब्दांत समज दिली आहे. अपघात, मृत्यू, हिंसाचार यांच्या संदर्भात बातम्या देताना वृत्तवाहिन्यांनी सभ्यता खुंटीला टांगून ठेवली होती. सामान्य माणसाला बघवणार नाही, अशा पद्धतीने या बातम्या देण्यात आल्या होत्या, अशा शब्दांत केंद्राने फटकारले आहे.
यासंदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने वृत्तवाहिन्यांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. खासगी वृत्तवाहिन्यांनी सनसनाटी पद्धतीने दिलेल्या १२ बातम्यांची उदाहरणे या मंत्रालयाने नमूद केली आहेत. त्यामध्ये क्रिकेटर ऋषभ पंत याला झालेल्या अपघाताच्या बातमीचाही समावेश आहे. या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे की, वृत्तवाहिन्यांनी अतिशय शिस्तीने व जबाबदारीने वागायला हवे. हिंसक घटनांच्या बातम्या देताना त्यातील प्रतिमा अस्पष्ट करणे किंवा लाँग शॉटमधून प्रसंग दाखविणे अशी खबरदारी न घेता सनसनाटी पद्धतीने या बातम्या दाखविण्यात आल्या. त्याचा लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊ शकतो. अशा बातम्यांमुळे एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर आक्रमण होण्याचा तसेच त्याची प्रतिमा मलिन होण्याचाही धोका असतो. (वृत्तसंस्था)
‘ती’ व्हिडीओ क्लिप एडिटही करत नाहीत
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, खासगी वृत्तवाहिन्या आपल्या कार्यक्रमासाठी सोशल मीडियावरून काही व्हिडीओ क्लिप घेतात. संबंधित कार्यक्रमाच्या संहितेला पूरक ठरण्यासाठी त्या व्हिडीओ क्लिपचे एडिटिंग करणे टाळले जाते. अशा पद्धतीने तयार केलेले कार्यक्रम खासगी वृत्तवाहिन्या प्रसारित करतात, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम आबालवृद्ध, महिला असे सर्वच जण पाहत असतात. हे लक्षात घेऊन वृत्तवाहिन्यांनी अपघात, मृत्यू, हिंसाचाराच्या बातम्या सनसनाटी पद्धतीने प्रसारित करणे टाळले पाहिजे.