नवी दिल्ली - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. बुधवारी रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला आणि पाठोपाठ ऋषी कपूर यांनीही जगाला अलविदा म्हटले. पाठोपाठ दोन दिग्गज अभिनेत्यांना बॉलिवूडने गमावले. ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ हिट झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राजकीय नेत्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 'ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीची मोठी हानी झाली' अशा भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत. 'ऋषी कपूर यांचे आकस्मिक निधन धक्कादायक आहे. एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक हास्य असायचं. ते कायम उत्साही असायचे. ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना करुयात. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराचे मी सांत्वन करतो' अशा शब्दांत राष्ट्रपतींनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ऋषी कपूर चैतन्यपूर्ण आणि बहुआयामी होते. त्यांच्याकडे गुणवत्तेचा खजिना होता. आमच्यातील संवाद कायम लक्षात राहील. अगदी सोशल मीडियावरील त्यांच्यासोबत संवाददेखील स्मरणात राहील. चित्रपटाच्या आणि देशाच्या प्रगतीबद्दल त्यांना कळकळ होती. त्यांच्या निधनानं व्याकूळ झालो आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत, अशा शब्दांत मोदींनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.
1973 च्या बॉबी पासून 2000 पर्यंत ऋषी कपूर हे रोमँटिक नायकाच्या भूमिका करीत होते. या दरम्यान त्यांनी 92 चित्रपटात काम केले, त्यापैकी 51 चित्रपटात ते सोलो हिरो होते तर 41 मल्टिस्टारर सिनेमे होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. 2000 पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. नमस्ते लंडन, औरंगझेब, हाउसफुल्ल 2, अग्निपथ अशा व अशाच अनेक हिट सिनेमात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.
महत्त्वाच्या बातम्या
Rishi Kapoor passed away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर म्हणजे गुणवत्तेचा खजिना; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल