मुंबई - भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांनी नुकतीच ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, ऋषी सुनक हे हिंदू धर्माचे आचरण करत असल्याने त्याचीच अधिक चर्चा होत आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांच्याबाबत ब्रिटनचे हाय कमिश्नर अॅलेक्स एलिस यांनी मोठं विधान केलं आहे. ऋषी सुनक हे हिंदू असले तरी त्यांचं मन आणि मेंदू हा ब्रिटिश आहे, असे एलिस यांनी म्हटलं आहे.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या मंचावरून ब्रिटिश हाय कमिशनर अॅलेक्स एलिस यांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनल्यानंतरचे भारत आणि ब्रिटनमधील संबंध, तसेच रशिया युक्रेन युद्धाचा जगावर पडत असलेला प्रभाव आणि ब्रिटनमध्ये लपून बसलेले विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्याबाबतही सविस्तर उत्तरे दिली.
ऋषी सुनक हे पंतप्रधान बनल्यानंतर भारत आणि ब्रिटनमधील संबंधात काय बदल होतील? असे विचारले असता अॅलेक्स एलिस यांनी सांगितले की, ऋषी सुनक यांनी अशा वेळी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे जेव्हा संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे. ऋषी सुनक यांचा इतिहास जरी भारताशी संबंधित असला तरी ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत.
याबाबत सविस्तर बोलताना अॅलेक्स एलिस यांनी सांगितले की, ऋषी सुनक हे पंजाबी मूडचे व्यक्ती आहेत. ते हिंदू आहेत. मात्र त्यांचं मन आणि मेंदू पूर्णपणे ब्रिटिश आहे. ते भारतीय वंशाचे जरूर आहेत. मात्र ते भारतासाठी नाही तर ब्रिटनसाठी काम करतील. ते ब्रिटिश पंतप्रधान आहे. भारत आणि ब्रिटन दोन्ही वेगवेगळे आहेत. दोघांमध्ये खूप फरक आहे. मात्र दोघेही परस्पर हितांसाठी काम करत राहतील.
दरम्यान, पंतप्रधान बनल्यानंतर ऋषी सुनक हे भारताला झुकतं माप देणार का? असं विचारलं असता अॅलेक्स यांनी सांगितले की, ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते यूकेचे हितसंबंध जपण्यासाठी काम करतात आणि यापुढेही करत राहतील.